मुंबई : मागील दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. पक्षांतर्गत बंडखोरी, नेत्यांची पक्षांतरं आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्यात सत्ता स्थापन झाली. मात्र, आता पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाची चाहूल लागली आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरात!
राज्यातील उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नुकतेच केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मिश्किल हास्यासह ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेवर भाष्य केले.
हेही वाचा : अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक
सामंत म्हणाले, “शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्त्वाखाली उत्तमरीत्या चालते आहे. उबाठा (UBT) पक्षाचे अनेक खासदार आणि आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येथे कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. आगामी तीन महिन्यांत माजी आमदार UBT पक्ष सोडून शिंदे गटासोबत येतील,” असा मोठा दावा त्यांनी केला.
सामंत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कोण कोण असंतोषातून बाहेर पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विरोधकांवर टीका आणि ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत स्पष्टीकरण
सामंत यांनी यावेळी विरोधकांवरही टीका करत, “न्यायिक व्यवस्थेवर वारंवार आक्षेप घेणे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणे, हे काही लोकांची फॅशन बनली आहे,” असे म्हणत विरोधकांना सुनावले.
तसेच, ‘लाडकी बहीण’ योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. “या योजनेत 65 वर्षांवरील व्यक्तींना लाभ मिळणार नाही, तसेच चारचाकी वाहन असणाऱ्या महिलाही पात्र ठरत नाहीत. मात्र, काही महिलांचा सहभाग अनावधानाने झाला असेल, त्यामुळे त्यांची संख्या आता कमी झाली आहे. पण लाडकी बहीण योजना थांबवण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, ती सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आता आगामी तीन महिन्यांत राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार का, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमागे काय तथ्य आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.