नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांच्या गळ्यात संत्री- वांग्याची माळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आज मोर्चा काढत आंदोलन केले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी यांची माळ घालून आंदोलन केले. याप्रसंगी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर “शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर”, “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस”, “विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल” आणि इतरही निदर्शने केली.
आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सुनील प्रभू , नाना पटोले, अनिल देशमुख, अभिजित वंजारी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकर, अशोक चव्हाण आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. सगळ्यांनी यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीनला भाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अश्या स्थितीत द्या. सरकार केवळ पंचनामे करत आहे. आम्हाला घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वापाच लाख हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यातील सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या नुकसानीच्या भरपाईसाठीची तरतूदही या पुरवणी मागण्यांत करण्यात आल्याचे समजते.