जळगाव । लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून याच दरम्यान वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव तालुक्यातील शिरसोली युनिटच्या वायरमनला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विक्रांत अनिल पाटील उर्फ देसले (३८, रा. माऊली नगर, जळगाव) असे लाचखोराचे नाव आहे.
याबाबत असे की, जळगाव शहरात राहणाऱ्या ४८ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम साईटचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. सदर पोल वरून विज कनेक्शन सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालय शिरसोली येथे गेले होते. वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत अनिल पाटील देसले यांनी सदरचे काम करून देण्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती. पैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते.
तरीपण विज कनेक्शन चालु करून देत नव्हते. ते विज कनेक्शन चालू करून देण्यासाठी उर्वरीत ठरलेले २० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत होते. त्याबाबत तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दि. १८ रोजी तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार दि. ८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल देसले पाटील याला उर्वरित २० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.