नंदुरबार : तालुक्यातील अमळथे येथे एका युवकास विजेच्या खांबावर चढवून काम करवित्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने संबंधित वायरमनला दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१४ जानेवारी २०२२ रोजी अमळथे येथे एका जुन्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी वायरमन शरद जाधव (वय ४१, रा. खोंडामळी) याने फिर्यादी दीपक दरबारसिंग गिरासे यांच्या भावास पंकज गिरासे यास कोणतीही कौशल्य व सुरक्षा साधने नसताना विजेच्या खांबावर झंपर जोडण्याचे काम दिले. पंकजने दोन फेज जोडल्यानंतर तिसरा फेज जोडत असताना त्याला विद्युत शॉक लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी वायरमन शरद जाधव घटनास्थळावरून फरार झाला होता. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०४ (गैर इराद्यात खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीस अटक केली आणि साक्षी-पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
ही सुनावणी नंदुरबार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या समोर पार पडली. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. तुषार कापडिया यांनी काम काज पाहिले. विविध साक्षीदारांच्या साक्षी व तपासातील पुराव्यांवरून आरोपीला दोषी ठरवण्यात आले.
अखेर न्यायालयाने आरोपी वायरमन शरद जाधव यास १० वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. या यशस्वी निकालाबद्दल पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी तपास पथकाचे व सरकारी अभियोक्त्यांचे अभिनंदन केले