नाशिक : विवाहबाह्य प्रेमसंबंधाला गावकऱ्यांनी विरोध केल्याने प्रेमी युगुलाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी १६ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, यापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उज्ज्वला रामकृष्ण खताळ (वय ३८ ) व ज्ञानेश्वर माधव पवार (वय ४१ ), असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक सुसाईट नोट लिहिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली १६ जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविद मिटके यांची बहीण उज्ज्वला हिचे गावातील ज्ञानेश्वर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावकऱ्यांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. तसेच त्यांना वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
उज्ज्वलाने तिचा भाऊ गोविद मिटके याला मंगळवार, ११ मार्च रोजी रात्री ८.५० वाजता व्हॉट्सॲपवर एक चिठ्ठी पाठवली. त्यात तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या १६ जणांची नावे नमूद केली होती.
त्यानुसार फिर्यादी गोविद मिटके आणि त्यांचे नातेवाईक तक्रार नोंदवण्यासाठी मनमाड पोलीस ठाणे गाठले मात्र, त्यांना उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर या दोघांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणी उज्ज्वला व ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या १६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.