मुंबई : महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार तर्कवितर्कांना उधाण आहे. मुख्यमंत्री पदावर एका शिवसैनिकाला बसवणार, असे म्हटल्यानंतर तुम्ही स्वत: मुख्यमंत्री झालात. आता महिला मुख्यमंत्री म्हणजे रश्मी ठाकरे मुख्यमंत्री बनवणार का?, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार… अशा प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एका कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उध्दव ठाकरेंच्या या विधानानंतर सोशल मीडियावर अनेक मेसेज व मिम्स व्हायरल होत आहेत. यातील बहुतांश मिम्स रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित आहेत. उध्दव ठाकरेंनी आतात ठरवून टाकले आहे की, पत्नीला मुख्यमंत्री करायचे, अशी टर उडवली जात आहे.