जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे ईलेक्ट्रीक मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, २५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संगिता मश्चिंद्र कुंभार वय ४० रा. आसोदा ता. जि.जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथे संगिता कुंभार या महिला आपले पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. मंगळवार, २५ जून रोजी सकाळी गावात नळाला पाणी आलेले होते. त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार चालु केलेली होती. त्यावेळी ते पाणी भरत होते. थोड्या वेळाने विद्यूत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे त्यांचे पती यांनी मोटार बंद करण्याचे पत्नी संगिता यांना सांगितले.
दरम्यान, संगिता कुंभार यांनी बटन बंद करण्यासाठी गेल्या तेवढ्यात विद्यूत पुरवठा सुरू झाला आणि त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पती मश्चिद्र कुंभार यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून खासगी वाहनातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहन दुगड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.
यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे असोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.