जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून बैल-गोऱ्हा ठार, विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

जळगाव : विजेचा धक्का लागल्याने योगीता गोसावी (४२, रा.जवखेडा ता.अमळनेर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर लोणी बुद्रुक ता. पारोळा येथे वीज कोसळून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे योगीता गोसावी (४२) आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होत्या. रविवार, ९ जून रोजी दुपारी २ वाजात घरात एकट्या असताना त्यांना कुलरमधील विजेचा धक्का लागला. ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने महिलेले अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.

दुसरी घटना पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे रविवारी ९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. येथील शेतकरी किशोर विनायक पाटील यांच्या मालकीचे एक गोऱ्ह व एक बैल वीज कोसळल्याने मृत्यूमुखी पडले. याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम पाटील, डॉ. असिफ कुरेशी व त्यांच्या टीमने सदर घटनास्थळी जाऊन जनावरांची पाहणी केली. त्यानंतर मयत गुरांचे शविच्छेदन करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे दोन जनावरे दगावली आहेत. शासनाकडून पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.