---Advertisement---
भुसावळ : महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला व तिच्या नातेवाईकांचा काही तरुणांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शेगाव रेल्वे स्टेशनहून गाडी सुटल्यावर अवघ्या ५ मिनिटांत घडली. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात जळगाव शहरातील महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ही २० वर्षीय महिला आपल्या पती व कुटुंबीयांसह शेगाव येथून जळगावकडे जाण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११०४० अप) च्या गार्डकडील दुसऱ्या जनरल डब्यात प्रवास करत होत्या. या वेळी डब्यामध्ये मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेत संशयित युवराज हिंमत पवार (वय २२), हर्षल सुभाष पवार (वय १७), चेतन योगेश पवार (वय १७), नरेंद्र संतोष पवार (वय २२) व प्रवीण मधुकर पवार (वय २२) यांनी फिर्यादी महिला व त्यांच्या नातेवाईकांशी अश्लील वर्तन केले. तर एकाने त्या फिर्यादी महिलेच्या नणंदेची ही छेड काढली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर वरणगाव स्टेशनवर गाडी थांबली असता एकाने उतरून महिलांसमोरच लघुशंका केली.
दरम्यान, ही माहिती दिल्यानंतर गाडी भुसावळ स्थानकात थांबल्यावर पोलिसांनी डब्यात येऊन पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यात. तर रेल्वे प्रशासन व सुरक्षा यंत्रणांकडून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.