जळगाव । सध्या सोशल मीडियामुळे ओळखी सहज जुळू लागल्या आहेत, मात्र त्यातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक तरुणी भावनिकरित्या गुंतून ठराविक लोकांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली असून, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित महिलेचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. मात्र, कौटुंबिक समस्या आणि पतीसोबत मतभेद झाल्याने ती मागील दोन वर्षांपासून अमळनेर तालुक्यातील माहेरी राहत होती. दरम्यान, २०२१ मध्ये इन्टाग्रामवर तिची ओळख एकनाथ छबिलाल पवार या तरुणाशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, कालांतराने महिलेचं एकनाथवर प्रेम जडलं.
हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’
एकनाथने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खापरखेडा, सोनवद आणि पुणे येथे नेऊन तिच्यात वेळोवेळी अत्याचार केला. मात्र, जेव्हा महिलेने लग्नाचा विषय काढला, तेव्हा तो सतत टाळाटाळ करू लागला.
महिला गर्भवती राहिल्यानंतर, एकनाथ पवार प्रचंड घाबरला आणि तिला सोडून पळून गेला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने, पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकनाथ छबिलाल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या घटनेमुळे सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना विशेष सावधानता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रेमाच्या नावे होणाऱ्या फसवणुकीला बळी न पडण्यासाठी तरुणींनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.