नवी दिल्ली : जगाला आज एका विश्वासार्ह भागीदाराची गरज आहे, उद्योजकांनी जागतिक पुरवठा साखळीत संधी शोधायला हव्या. भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनले असून, यात लघुउद्योगांना मोठ्या संधी आहे. त्यासाठी सरकारन पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी २ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना आणली आहे. कमी व्याजदरात आणि कमी वेळेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी नवीन पद्धत विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
एका वेबिनारला मंगळवारी आभासी पद्धतीने संबोधित करताना मोदी म्हणाले, जागतिक स्तरावर संधीचा फायदा व्हावा, यासाठी उद्योगांना कर्जासह मार्गदर्शनाचीही गरज आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम देशपातळीवर सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात संपूर्ण जग भारताकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहत आहे. सरकारने १४ क्षेत्रांसाठी सुरू केलेल्या पीएलआय योजनेमुळे १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली, तर १३ लाख कोटी रुपयांची उत्पादन निर्मिती होण्यास मदत झाली. नियम आणि कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे व्यवसायाला आधार मिळाला. भारताच्या औद्योगिक, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवर लक्ष केंद्रीत करून अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या, त्याची योग्य अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
उद्योगांनी संशोधन आणि विकासाचा वापर करून परदेशात मागणी असलेल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे निर्यातीला चालना मिळेल. खाजगी क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधींशी सल्लामसलत करून, अर्थसंकल्पातील उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी रणनीती तयार करण्याची आवश्यकता आहे. देशातील धोरणात्मकसुधारणाआणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी यासारखे वेबिनार महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.