मनोज माळी
तळोदा : धडगांव तालुक्यातील बिलगांवच्या हेंद्र्यापाड्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विशेषतः गर्भवती महिलाही जीव मुठीत घेऊन डोंगर दऱ्यात पाण्यासाठी प्रवास करत आहेत. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली. याबाबत नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
पाणी हेच जीवन आहे, पाणी नसेल तर जीवन नाही, पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही, याची खरी प्रचिती बिलगांव- हेंद्र्यापाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर द-यातला जीवघेणा प्रवास व भटकंती पाहून येते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की, हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो; घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते. एकीकडे ‘हर घर नल’चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे. दुसरीकडे ही योजना दुर्गम भागात केवळ कागदोपत्रीच पोहचली आहे, पाणी मात्र पोहचलेच नाही. या पाड्यांची एकूण १३० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल, अशा अनेक समस्या सुटतील.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत धडगांव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी ,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हर घर नल चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे.या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे,प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचवणे हा मुख्य उद्देश असला तरी बिलगांव हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव बिरसा फायटर्सचे सुरतान पावरा, बान्या पावरा, वागऱ्या पावरा कुशाल पावरा,बिरसा फायटर्स शहादाचे सुनिल मुसळदे, बापू पवार, चंद्रसिंग सोनवणे,अंबर सोनवणे,हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभीमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.