Jalgaon : पिंक रिक्षा चालक महिलांनी इतिहास घडविला!

जळगाव : आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कुटुंबाला हातभार लावावा, म्हणून रिक्षा चालविण्याचे धाडस करून पिंक रिक्षा चालक महिलांनी इतिहास घडविला आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी प्रतिपादन केले.
भारत विकास परिषदेतर्फे आयोजित जळगाव शहरातील महिला रिक्षा चालकांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून किरण कासार, विद्याधर नेमाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक उज्वल चौधरी, अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील, राधिका नारखेडे आदी उपस्थित होते.
या महिलांनी सुरुवात करून जे धाडस केले आहे त्यामुळे आज त्यांची संख्या पंधरा झाली आहे त्यात वाढ होऊन ती लवकरच पन्नास व्हावी, अशी अपेक्षाही  शाम लोही यांनी व्यक्त केली. तसेच बिनधास्तपणे काम करा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही देऊन भारत विकास परिषदेचा हा सत्कार त्यांना प्रोत्साहन देणार आहे असे प्रतिपादन केले.
 खानदेशातील हा पहिला उपक्रम असून नाशिक मध्ये देखील सध्या नसलेला पण आपला हा दिशादर्शक उपक्रम तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच बाहेरचे वातावरण, रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम व शिस्त यासाठी स्वयंसेवी संस्थांची योगदान गरजेचे आहे असे त्यांनी आवाहन केले.
 किरण कासार यांनी प्रवाहाच्या विरोधात काम करण्यासाठी हिम्मत लागते महिला रिक्षा चालक ही धाडसी संकल्पना असून त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीतून केलेल्या संघर्षाचे स्वतःचे उदाहरण देखील कासार यांनी सांगितले.
 महिलांनी रिक्षा चालक झाल्यानंतर त्यांच्या परिवारात आर्थिक समृद्धी यायला लागली आहे. भारत विकास परिषदेच्या सत्कारामुळे इतर महिलांना देखील प्रेरणा मिळेल असे मत विद्याधर नेमाने व्यक्त केले.
माधुरी भालेराव, पौर्णिमा कोळी, माधुरी निळे,रंजना पवार व मालुबाई सोनवणे या महिला चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महिला रिक्षाचालकांनी जळगाव जनता सहकारी बँकेचा बचत गट विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, शाम लोही, जमीन देशपांडे, विद्याधर नेमाने यांचे सहकार्य लाभल्याचे मनोगतात सांगितल.
कार्यक्रमात भारत विकास परिषदेच्या महिला संयोजिका वैशाली गोरे, सेवा विभागाचे उपाध्यक्ष डॉ. विकास चौधरी, सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक महेश जडिये यांनी तर आभार उमेश पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन हेमांगिनी महाजन व सुप्रिया तळेले यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीताने सांगता झाली.