Three hundred rupees bribe : Sakari Talathi in Jalgaon ACB’s net भुसावळ : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या साकरी व खडका गावच्या तलाठी मनिषा निलेश गायकवाड (38, रा.मोरेश्वर नगर, साकेगाव शिवार, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खडका गावातील तलाठी कार्यालयात रंगेहाथ अटक केल्याने महसूल यंत्रणेतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
खडका कार्यालयात स्वीकारली लाच
34 वर्षीय तक्रारदार भुसावळातील रहिवासी असून त्यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केला आहे. तक्रारदार त्यांच्या प्लॉटचे इंडेक्स-2 व खरेदीखत घेऊन 7/12 उतार्यावर नाव लावण्यासाठी तलाठी यांच्याकडे आल्यानंतर मनीषा गायकवाड यांनी मंगळवार, 31 रोजी काम करून देण्यासाठी तीनशे रुपयांची पंचांसमक्ष मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. खडका येथील तलाठी कार्यालयात गायकवाड यांनी पंचांसमक्ष लाक्ष स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव, महिला हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक जनार्धन चौधरी, पोलीस नाईक किशोर महाजन, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.