Womens T20 World Cup । पाकिस्तानला दुसरा धक्का, पाच षटकात २५ धावा

Womens T20 World Cup । महिला T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन फातिमा सना हीने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्‍तान संघाची सुरुवात अत्‍यंत खराब झाली. पहिल्‍याच षटकात रेणुका सिंगने गुल फिरोजाला क्‍लीन बोल्‍ड केले. अवघ्‍या एक धावेवर पाकिस्‍तानला पहिला धक्‍का बसला. त्यानंतर दीप्ती शर्माने पाकिस्तानला दुसरा धक्का दिला असून, पाकिस्तन पाच षटकात २५ धावांवर खेळत आहे.

 

सलामीच्या लढतीतील पराभवानंतर दमदार पुनरागमनास उत्सुक असलेल्या भारतीय संघासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. पहिल्या साखळी लढतींतील निकालांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत चुरस निर्माण झाली असून भारतीत संघासाठी उर्वरित लढतींत विजय मिळवणे महत्त्वाचे झाले आहे.

भारताला शुक्रवारी आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशांना धक्का बसला आहे. भारतीय संघासाठी त्यामुळे पुढील सर्व सामने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारताची सरासरी धावगती चांगली नाही. त्यासाठी त्यांना आता पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही विभागांत खराब कामगिरी केली.

भारताला या उणिवा दूर कराव्या लागणार आहेत. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते. पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी भारताला संघ रचनेत सुधारणा करावी लागणार आहे.

गोलंदाजांची अनुभवी फळी
पाकिस्तानची फलंदाजी तितकीशी मजबूत नसली, तरी त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज आहेत. निदा दार, कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांसारख्या गोलंदाज प्रभावी मारा करण्यात सक्षम आहेत. सलामीच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय साकारला. त्यामुळे पाकिस्तान पराभूत करायचे झाल्यास भारतीय संघाला आपला खेळ उंचवावा लागेल.