नवी दिल्ली : एकीकडे भारताच्या शेजारी देशांची परिस्थिती बिकट होत असताना जागतिक बँकेने भारताबाबत खुश करणारा अहवाल जारी केला आहे. जागतिक आव्हानांदरम्यान भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, तर चीन आणि पाकिस्तान बिकट झालेली आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी धडपडत आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गुंतवणूक आणि देशांतर्गत मागणीच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्था ६.३% दराने वाढण्याचे अपेक्षित आहे.
जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जागतिक मंदीच्या भीती दरम्यान भारताची अर्थव्यवस्था सातत्याने ताकद दाखवत असून एकीकडे भारत सातत्याने मजबूत होत असताना दुसरीकडे शेजारी देशांची परिस्थितीत बिकट होत चालली आहे. चीन आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. याकडेही जागतिक बँकेच्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
जगातील प्रमुख अर्थव्यस्था मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र सकारात्मक वाटचाल करत आहे. चीन असो किंवा अमेरिका दोन्ही महासत्ता आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहेत, तर भारताकडे सुवर्ण संधी आहे. जगभरातील कंपन्या भारताकडे वळत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. एकेकाळी ज्या परदेशी कंपन्यांसाठी चीन पहिली पसंत होता त्या आता चीनमधून बाहेर पडून भारताकडे वळत आहेत.
पाकिस्तानची अवस्था एकदम बिकट
पाकिस्तानची आर्थिक स्थिती व्हेंटिलेटरवर पोहोचली आहे. देशातील महागाई गगनाला भिडली आहे, तर प्रचंड ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी आतंरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ने बेलआउट पॅकेज कमी केले आहे. आयएमएफच्या तीन अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजमुळे पाकिस्तान दिवाळखोरीतून वाचला असला तरी, तेथील जनता महागाईने त्रस्त आहे. गॅस सिलिंडरची किंमत ३,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
चीनचीही अवस्था वाईट
जगाची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन देखील मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. लॉकडाऊनच्या कठोर नियमांनी चीनचा पाठीचा कणा मोडला आहे. चीनचे रिअल इस्टेट मार्केट गंभीर संकटात सापडले असताना निर्यातीत सातत्याने घसरण होत असून बेरोजगारी शिखरावर पोहोचली आहे. विदेशी कंपन्या चीन सोडून बाहेर पडत आहेत.