यजमान भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत श्रीलंकेचा ३०२ धावांनी धुव्वा उडविला आणि रुबाबात एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
टीम इंडियाने विश्वकरंडकातील विक्रमी विजयाला गवसणी घातली आहे. भारताचा हा विश्वकरंडकातील सर्वाधिक धावांनी मिळविलेला विजय ठरला. भारताने साखळी फेरीतील सातही लढती जिंकल्या असून आता दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स यांच्याविरुद्धचे सामने बाकी आहेत.
शुभमन गिल (९२ धावा), विराट कोहली (८८ धावा), श्रेयस अय्यर (८२ धावा) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने आठ बाद ३५७ धावांचा डोंगर उभारला. कोहली व गिल यांनी मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ३५८ धावांच्या ओझ्याखाली श्रीलंकेच्या संघातील फलंदाजांना निभाव लागला नाही.
जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी कामगिरीसमोर त्यांचा डाव १९.४ षटकांत ५५ धावांवरच गडगडला. फक्त तीनच खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या करता आली. शमीने १८ धावा देत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. सिराजने १६ धाव देत तीन फलंदाज बाद केले. श्रीलंकेच्या संघाचा विश्वकरंडकातील हा नीचांक ठरला.
आता या विजयासह भारताने सेमी फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. पण त्यानंतर भारतीय संघासाठी अजून एक मोठी गुड न्यूज आली आहे. यापूर्वी भारतीय संघाने सहा विजय मिळवले होते. त्यामुळे सहा विजयांसह भारताने १२ गुण मिळवले होते. पण या सामन्यातील विजयानंतर भारताला अजून दोन गुण मिळाले आणि त्यांचे १४ गुण झाले आहेत.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही सहा विजय मिळवले होते आणि त्यांचे भारतासारखेच १२ गुण मिळवले होते. पण रन रेट चांगला असल्यामुळे त्यांनी भारताला दुसऱ्या स्थानावर ढकलले होते आणि अव्वल स्थान पटकावले होते. पण या सामन्यात विजय मिळवत भारताचे १४ गुण झाले आहेत. या १४ गुणांसह भारताने वर्ल्ड कपच्या गुणतालिकेत आता अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही अजून एक गुड न्यूज असेल.
भारतीय संघाने सलग सात विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय संघाने १४ गुण मिळवले आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारतासारखी कामगिरी कोणत्याही संघाला आतापर्यंत करता आलेली नाही.