वर्ल्डकप फायनल : अहमदाबादेत हॉटेलचे भाडे २० हजारांवरुन १ लाखांवर पोहचले

अहमदाबाद : वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेचे दोन अंतिम फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्डकप फायनलची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. वर्ल्डकप फायनलमुळे अहमदाबादेतील हॉटेल्सचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी शानदार झाली असून टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाची कामगिरीही उत्कृष्ट झाली आहे. आता २० वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भिडणार आहेत. २० वर्षांपूर्वी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया १९ नोव्हेंबरला मैदानात उतरणार आहे.

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादमधील हॉटेलचे भाडेही खूप वाढले आहे, पण नंतर लोक सामना पाहण्यासाठी दूरदूरहून अहमदाबादला पोहोचत आहेत. हा सामना पाहण्यासाठी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातून क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचत आहेत. याबाबत प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

वर्ल्ड कप फायनलमुळे हॉटेलच्या भाड्यात वाढ झाल्याबद्दल फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गुजरातचे अध्यक्ष नरेंद्र सोमाणी म्हणाले, “भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे त्याचा उत्साह देशभर पाहायला मिळतो आहे. दुबई, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील लोक येथे येऊन सामना पाहण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे ज्या खोल्यांची किंमत २० हजार रुपये होती ती आता ५० हजार रुपये ते १ लाख २५ हजार रुपये झाली आहे.