World Test Championship: केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला लोळवत टीम इंडियाने नवीन वर्षाची सुरुवात विजयाने केली. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दरम्यान, या विजयाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला असून दक्षिण आफ्रिकेचं नुकसान झालं
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे टीम इंडियासाठी गरजेचे होते. रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी या सामन्यासाठी खास रणनीती आखली होती.
भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात ४ वेगवाग गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह उतरला होता. केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ ५५ धावांवर तंबूत पाठवला.
त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात १५३ करत दक्षिण आफ्रिकेवर ९७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा डाव १७६ धावांवर गडगडला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी ७९ धावांची गरज होती. भारताने हे आव्हान ७ गडी राखत पूर्ण केले. या विजयासह भारताने पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला देखील घेतला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाची WTC गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरण झाली होती. पण दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला आहे.
WTC गुणतालिकेत भारतीय संघ पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी ५४.१६ टक्के इतकी झाली आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश ५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचा क्रमांक लागतो.