WPLलिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे ‘हे’ स्वप्न करणार पूर्ण

महिला प्रीमियर लीग (WPL-2024) च्या आगामी हंगामापूर्वी मुंबईत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील या लिलावात वृंदा दिनेश हिच्यावर 1.30 कोटी रुपयांची बोली लागली.

लिलावानंतर वृंदा इतकी भावूक झाली होती की तिला आईला हाक मारण्याचे धाडस करता आले नाही. असे असताना तिला आता बालपणीचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करायचे आहे.

22 वर्षीय वृंदा दिनेश शनिवारी WPL लिलावात दुसऱ्या क्रमांकावर विकली जाणारी ‘अनकॅप्ड’ (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेली) भारतीय बनली. भारताच्या काश्वी गौतमला गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. जी या लिलावात सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली.

जेव्हा यूपी वॉरियर्सने कर्नाटकची बॅटर वृंदाला विकत घेतले तेव्हा तिने रायपूरहून बेंगळुरूमध्ये तिच्या व्हिडीओ कॉल केला नाही. आई समोर आल्यावर आपण भावूक होऊ हे वृंदाला माहिती होतं. ‘मला वाटते तिच्या (आईच्या) डोळ्यात अश्रू आले होते. मी व्हिडीओ कॉल केला नाही कारण तिच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हती’, असे तिने सांगितले.

वृंदा सध्या 23 वर्षांखालील महिला टी-20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे. मोठ्या रकमेत विक्री केल्याने खेळाडूंवर दबाव येतो ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो, यावर तिला प्रश्न विचारण्यात आला.

‘मोठ्या रकमेत विकले जाणे माझ्या अधिकारात नाही. या रकमेने फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही कारण शेवटी मी खेळण्यासाठी आणि खेळाचा आनंद घेण्यासाठी आले आहे, असे तिने सांगितले.

‘संघाने माझी लीगमध्ये खेळण्यासाठी निवड केली आहे. मला माझे सर्वोत्तम द्यायचे आहे, असे वृंदा म्हणाली. या रकमेचे तू काय करणार? असे वृंदाला विचारले असता, मी आधीच एक योजना बनवली होती, असे ती सांगते.

माझे आई-वडिल खूप भारावून गेले होते. ते माझ्यासाठी खूप आनंदी होते. मला त्यांचा अभिमान वाटतो. माझ्या आई-वडिलांना त्यांनी नेहमी स्वप्नात पाहिलेली कार मी देईन. या क्षणी हे माझे पहिले लक्ष्य आहे आणि आपण नंतर पाहू, असे तिने सांगितले.