WTC 2023 Final: मॅचच्या आधी संघ निवडीवरून गोंधळ!

WTC 2023 Final:  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलच्या आधी भारतीय संघासमोर अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान आहे.

जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. याआधी पहिल्या WTC फायनलमध्ये २०२१ साली भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. गेल्यावेळी फायनल मॅचमध्ये भारताचे स्टार गोलंदाज आणि ऑलराउंडर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे दोने संघात होते. तेव्हा टीम इंडियाचा ८ विकेटनी पराभव झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध दोन फिरकीपटूंना खेळवण्याच्या निर्णयावर तेव्हा खुप टीका झाली होती. आता पुन्हा अंतिम संघ निवडीवरून चर्चा सुरू झाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये अश्विनने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात १५ ओव्हरमध्ये १८ धावा देत २ तर दुसऱ्या डावात १० ओव्हरमध्ये १७ धावा देत २ विकट घेतल्या होत्या. जडेजाने पहिल्या डावात ७.२ ओव्हरमध्ये १ विकेट तर दुसऱ्या डावात ८ षटके गोलंदाजी केली होती. आता भारत पुन्हा इंग्लंडमध्ये फायनल मॅच खेळत आहे तर या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची यावरून मतभेद सुरू आहेत.

भारतीय संघाने काय करावे? अश्विन आणि जडेजा या दोघांना अंतिम ११ मध्ये स्थान द्यावे की दोघांपैकी एकाची निवड करावी? परदेशात अश्विन पेक्षा जडेजाला अधिक पंसती दिली जाते. २०२० नंतर त्याच्या फलंदाजीकडे देखील X फॅक्टर म्हणून पाहिले जाते. तामिळनाडूचे माजी फिरकीपटू आणि अश्विनचे माजी कोच सुनील सुब्रमण्यन यांनी मान्य केले की, हा निर्णय इतका सोपा आणि सहज असणार नाही. जर दोघेही चांगली गोलंदाजी करत असतील तर दोघांना संधी द्यावी. पण जर हवामानाचा अंदाज खराब असेल तर तुम्हाला ३ जलद गोलंदाज लागतील.

न्यूझीलंडविरुद्ध २०२१च्या फायनलमध्ये अश्विनने चांगली कामगिरी केली होती. तर जसप्रीत बुमराहची कामगिरी खराब झाली होती, जी भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरली होती. त्याला एक देखील विकेट मिळाली नव्हती. या मॅचनंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला संघाबाहेर करण्यात आले होते. बुमराह संघात नसल्याने भारताची जलद गोलंदाजी थोडीशी कमकूवत वाटते. त्यामुळे या दोघांना संधी मिळू शकते. रवी शास्त्रींच्या मते चार जलद गोलंदाज आणि एक ऑलराउंडर हा सर्वोत्तम संघ ठरू शकतो. पण जर तुमच्याकडे जलद गोलंदाज नसेल तर फिरकीपटूंना संधी द्यावी लागले.