Yawal Accident News : ट्रॅक्टरमधून तोल जाऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू

---Advertisement---

 

यावल : एक २२ वर्षीय तरुण मित्रांसह ट्रॅक्टरवरून फैजपूर येथे घरी परत येत असतांना मला चक्कर येत आहे, टॅक्टर थांबवा असे त्याने सांगितले. यानंतर त्याचा तोल जाऊन तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. यातच त्याचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना फैजपूर परिसरात न्हावी गावाजवळील चावदस नगर टोल नाका येथे घडली. हा अपघात रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव आदित्य तुळशीराम काठोके (रा. कासारगल्ली, फैजपूर) असे आहे. या घटनेची माहिती मृताचे काका विलास बळीराम काठोके (वय ४७) यांनी पोलिसांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आपल्या मित्रासोबत न्हावी येथून ट्रॅक्टरवरून परत येत होता. त्यावेळी त्याने अचानक ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले आणि ‘मला चक्कर येत आहे’ असे सांगितले. यानंतर अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी डॉ. खाचणे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार देवीदास विष्णू सुरदास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अचानक झालेल्या घटनेमुळे काठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्यच्या मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---