जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना यलो तर पुण्यासह १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ; वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत असल तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २-३ दिवसांच्या पावसाच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट होईल, असं असलं तरीही राज्यातील अनेक भागांना आज ऑरेंज आणि यलो अलर्ट असणार आहे. यामुळे अधून-मधून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुढच्या २-३ दिवसांत मात्र पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार, २९ जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील. दरम्यान, जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं असलं तरी ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.