होय, २०१४, २०१७, २०१९ मध्ये भाजपाशी चर्चा झाली होती; शरद पवारांची कबुली

मुंबई : खुद्द शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये चर्चा झाली होती, असा दावा अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांनी केलेल्या या दाव्यावर शरद पवार यांनी मान्य केला आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपासोबत चर्चा झाली होती. मात्र विचारसरणी वेगळी असल्याने ही चर्चा पुढे सरकू शकली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आमने-सामने आले आहेत. त्यातच अजित पवार यांनी थेट राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ ह्या चिन्हावर दावा ठोकल्याने शरद पवारांसमोरील आव्हान वाढले आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन करताना अजित पवार यांनी शरद पवारांचं नाव न घेता अनेक गौप्यस्फोट केले होते. यातील सर्वात मोठा गौप्यस्पोट म्हणजे, खुद्द शरद पवारांनी भाजपासोबत जाण्यासंबंधी चर्चा केली होती, असा दावा अजित पवारांनी केला होता.

या दाव्याबाबत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सांगितले की, आम्ही २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपासोबत चर्चा केली होती. मात्र आपली विचारसरणी वेगळी असल्याने आपण असं करता कामा नये, असं मी ठरवल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कुटुंबात जे काही झालं त्याची चर्चा मी बाहेर करणार नाही.

मला नक्कीच वाईट वाटलं. हे सारे जण माझे जवळचे होते. मात्र मी आधीही अशा घटनांचा सामना केला आहे. मी पक्षाला पुन्हा उभं करेन. निवडणूक आयोगामध्ये काय होईल. त्याने फरक पडत नाही. मी जमीनीवर काम करेन, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मी वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करू शकतो. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मी ना टायर्ड झालोय, ना रिटायर्ड झालोय, अशा शब्दात निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे.