वाराणसी : ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठं विधान केलं आहे. “ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल. देवाने ज्यांना डोळे दिले आहेत त्यांनी पाहावं. त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. याप्रकरणी मुस्लीम पक्षकारांनी पुढे यावं आणि सांगावं की, ही इतिहासातील चूक असून त्यावर उपाय काढण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI पॉडकास्टमध्ये आपलं म्हणणं मांडलं. योगी आदित्यनाथ यांना ज्ञानवापी मशिदीसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, “ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल. देवाने ज्यांना डोळे दिले आहेत त्यांनी पाहावं. त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? आम्ही तर ठेवले नाही. तिथे ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. भिंती ओरडून ओरडून काय सांगत आहेत?”.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत की, “मी 6 पेक्षा जास्त वर्षं झाली उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. गेल्या 6 वर्षात कोणतीही मोठी दंगल झालेली नाही. तुम्ही उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुका आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुका पाहा. त्या लोकांना देशाचा पश्चिम बंगाल करायचा आहे. काही लोकांना सत्तेत येऊन जबरदस्तीने सर्व व्यवस्था ताब्यात घ्यायची आहे. तेच पश्चिम बंगालमध्ये दिसत असल्याचे ते म्हणाले.
“देश फक्त राज्यघटनेवरच चालणार, मतं आणि धर्मावर नाही. मी ईश्वराचा भक्त आहे, पण कोणत्याची ढोंगीवर विश्वास ठेवत नाही. मत आणि धर्म आपल्या परीने असेल आपल्या घऱात, मशिदीत, प्रार्थनाघरात असेल. रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी नाही. तुम्ही एकमेकांवर गोष्टी लादू शकत नाही. देशात जर कोणाला राहायचं असेल तर त्याला देशाला सर्वोतपरी मानावं लागेल. आपलं मत आणि धर्म ही प्राथमिकता नसेल”, असेही त्यांनी ठासून सांगितले.