हिंदी चॅनलवाल्यांना गाडी पलटीची अपेक्षा, योगी आदित्यनाथ उतरवणार अतिक अहमदचा नक्षा?

तरुण भारत लाईव्ह न्यूज । विभाकर कुरंभट्टी । काल रात्री उशीरा आणि आज अगदी पहाटेपासून सगळ्या हिंदी न्यूज चॅनलवाल्यांनी ‘गाडी पलट भी सकती है’ असं उच्चरवात सांगायला सुरूवात केली. कोणतंही हिंदी न्यूज चॅनल लावा, सगळीकडे एकच बातमी कुख्यात गुन्हेगार ‘अतीक अहमद’ची. काल उशीरा अतीक अहमदचा साबरमती जेल ते प्रयागराज जेल असा प्रदीर्घ प्रवास रस्ता मार्गे सुरू झाला. तो आज सायंकाळी किंवा रात्री संपेल. टीआरपी मिळविण्याची ही सुवर्णसंधी हिंदी चॅनलवाले थोडीच सोडणार! अतिशय धावपळीत, दम लागल्याचे उसासे टाकत अतिकच्या गाडीचा पाठलाग करत तारस्वरात, जेवढे फास्ट बोलता येईल तेवढे फास्ट बोलत दर्शकांना धरून ठेवण्याची स्पर्धा चॅनलवर सुरू होती. प्रत्येकाचे रिपोर्टींग थोडेफार वेगवेगळे होते, पण सगळ्यांचा मतितार्थ एकच ‘गाडी पलट भी सकती है’ हे सगळे कॅमेरामन, रिपोर्टर गाडी पलटण्याची आणि तो जीवघेणा क्षण कॅमेर्‍यात टिपण्यासाठी आतुर झालेले होते. त्यासाठी ते साबरमती ते प्रयागराज दरम्यान पोलीस काफिल्याचा पाठलाग करत होते.

‘गाडी पलट भी सकती है’ या निष्कर्षावर सगळ्यांचे एकमत का झाले? योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे सर्वाधिक खंबीर आणि गुन्हेगारीचे कर्दनकाळ ठरलेले मुख्यमंत्री. बिहार, उत्तरप्रदेश ही दोन्ही राज्ये अख्या भारतात गुंडगिरी आणि गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील गुंडाराज आणि गुन्हेगारी संपविण्याचा विडा उचलला आहे. अनेक गुन्हेगारांचे एनकांउटर केले तर कितीतरी गुन्हेगारांच्या संपत्तीवर बुलडोजर चालवला. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या व्यक्तींचा भर बाजारात खून झाला आणि योगींनी त्या मागे असणारी गुन्हेगारांची पिल्लावळ उखडून टाकण्याचा चंग बांधला. अतिक अहमद हा स्वत:, त्याचा भाऊ, त्याची मुले अख्खं खानदानच गुन्हेगारीत रमलेले. प्रचंड दहशत. निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी, भष्टाचारासाठी लुटमार करण्यासाठी अतिक गँगचा वापर होत होता. महान धर्मनिरपेक्ष नेते स्व.मुलायमसिंग यादव यांचे आणि त्यांनतर त्यांचे ‘स्वत:ला स्वच्छ म्हणविणारे’ अखिलेश यादव यांचे डॉन अतिकवर कृपाछत्र होते. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना जीवाच्या आणि अबु्रच्या भितीने लपून बसण्याची वेळ १८० गुन्हे अंगावर असणार्‍या या अतिक अहमदनेच आणली होती. (यानंतरच मायावती आणि मुलायमसिंग यांची युती तुटली होती) या अतिकला अटक करून योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारी मुक्तीच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे.

‘बुलडोजर बाबा’ आणि ‘गुन्हेगारांचे एनकांऊटर’ या दोन गोष्टींमुळे अतिक अहमद साबरमतीहून प्रयागराजला सुरक्षित पोहचणार की ढगात पोहचणार? याकडे सगळ्या भारताचे लक्ष लागले होते. अर्थात मानवाधिकारवाल्या गँगला गुन्हेगारांविषयी उमाळा आणण्याची संधी देण्याइतपत योगी दुधखुळे नाहीत. परंतु सगळ्याच हिंदी चॅनलवाल्यांना जेव्हा एकमुखाने शंका येते ‘गाडी पलट भी सकती है’ तेव्हा त्या मागे योगींची गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली दहशत किती जबरदस्त आहे याची तीव्रतेने जाणीव होते.

काल रात्री अतिक अहमदच्या कार्यक्षेत्रात निवास असणार्‍या व्यक्तीशी फोनवर बोलणे झाले. त्यामुळे योगींनी किती आवश्यक विषयाला हात घातला आहे ते समजले.
आपले मराठी न्यूज चॅनल दिवसभर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चालवत असतात. संजय राऊत, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्या भोवती बूमचा दांडा धरून फेर धरून नाचत असतात. मागच्या आठवड्यात खलिस्तानवादी अमृतपालसिंग प्रकरण घडले. आता अतिक अहमद. मराठी चॅनलवाल्यांना या राष्ट्रीय विषयांचे फार काही सोयरसूतक नसते. अतिक अहमद हा फक्त उत्तरप्रदेशपुरता विषय नाही तर तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याने गुन्हेगारीविरुद्ध उचललेले आक्रमक पाऊल, त्याचे पडसाद पाच-सहा राज्यात पाडणारे आहे.

मुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आणि योगींच्या कार्यशैलीत निश्‍चित फरक आहे. मात्र सध्याची राजकीय नेत्यांच्या आश्रयाने फोफावलेली गुंडगिरी शिंदे आणि फडणवीसांनी आटोक्यात आणून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण व्हावी अशी सर्वसामान्य मराठी जनतेची अपेक्षा आहे.
शेवटी योगींच्या बाबतीत एक वाक्य सांगावेसे वाटते ‘ये डर अच्छा’ है.