पुणे : घरगुती वादातून पत्नीला घटस्फोटाची धमकी देत न्यायालयात आलेल्या तरुणाने पत्नी आणि मुलांसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर न्यायालय आवारात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
शनिवारी (ता. ८ ) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सोहेल येनघुरे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो पत्नी आणि दोन लहान मुलांसह पाषाण येथे राहत होता. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या सोहेलने पुण्यात मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला होता.
हेही वाचा : दारू पाजली अन् केला जबरदस्तीचा प्रयत्न; नकार दिल्याने… नागपुरात अमानवीय कृत्य
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल आणि त्याची पत्नी यांच्यात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत होते. शनिवारी त्यांच्या घरात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात सोहेलने पत्नीला ‘आपण घटस्फोट घेऊ’ असे म्हणत तिला आणि मुलांना घेऊन थेट शिवाजीनगर न्यायालयात पोहोचला. मात्र, शनिवारी न्यायालयीन कामकाज बंद असल्याने परिसरात फारशी गर्दी नव्हती.
न्यायालय आवारातील सोसायटी ऑफिसजवळील चिंचेच्या झाडाखाली बसून कुटुंबाने जेवण केले. यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरात सोहेलने पत्नीची ओढणी हिसकावली आणि त्याच झाडाला गळफास लावून घेतला. हे सर्व त्याच्या पत्नी आणि मुलांच्या डोळ्यासमोर घडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांची पत्नी घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सोहेलचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत हे कृत्य वैवाहिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात हळहळ
पत्नी आणि मुलांसमोरच अशा प्रकारे आत्महत्या झाल्याने न्यायालय परिसरात उपस्थित नागरिक हादरले. घटनेनंतर सोहेलच्या पत्नी आणि मुलांची अवस्था पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबातील वैवाहिक वाद कसे टोकाला जात आहेत, यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.