---Advertisement---
जळगाव : आजीचे निधन झाल्यामुळे मावशीकडे आलेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात जळगाव शहरातील सुप्रिम – कॉलनीजवळ झाला. प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (१८, रा. लोंढरी, ता. जामनेर) असे मृत तरुणाचे नाव असून, एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा उत्तीर्ण होवून महाविद्यालयीन शिक्षणासाठी जयपाल हा सध्या छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाल्यामुळे तो आई-वडील आणि बहिणीसह सुप्रिम कॉलनीमध्ये मावशीच्या घरी आला होता.
मंगळवारी तो दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जात असताना सुप्रीम कॉलनीजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला.
हा अपघात मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सुप्रिम – कॉलनीजवळ झाला. आई-वडिलांना जयपाल हा एकुलता एक मुलगा होता. त्यालाही काळाने हिरवल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---Advertisement---