बिजनोर, उत्तर प्रदेश : पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांच्या सततच्या छळाला कंटाळून रोहित सैनी या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात रोहितने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे.
भावनिक सुसाईड नोट
घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये रोहितने लिहिलं आहे की, ”आई, मला माफ कर, माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला अजिबात दाखवू नको. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी आणि तिचं कुटुंबच जबाबदार आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सैनीचं लग्न चांदपूर परिसरातील नैपुरा गावातील प्रितीशी १३ महिन्यांपूर्वी झालं होतं. मात्र, लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वाद सुरू झाले. वाद इतके टोकाला गेले की, प्रितीने विष प्राशन करण्याचा बनाव केला होता. त्यावेळी रोहितने तिला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं. मात्र, त्यानंतरही तिने वारंवार रोहितला त्रास देण्यास सुरुवात केली.
रोहितच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, प्रिती आणि तिच्या कुटुंबीयांनी वेगळं होण्याच्या बदल्यात रोहितकडे १० लाख रुपये मागितले होते. सततच्या धमक्यांमुळे रोहित प्रचंड तणावाखाली होता. अखेर या सगळ्याला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
आईचा आक्रोश, पत्नीवर कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर रोहितच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. रोहित हा आपल्या आईचा एकमेव आधार होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं होतं. त्याला दोन बहिणी असून, त्यांचे विवाह झालेले आहेत. विशेष म्हणजे, रोहितला चार महिन्यांचं बाळही आहे, जे सध्या त्याच्या पत्नीच्या ताब्यात आहे.
रोहितच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, आपल्या चार महिन्यांच्या नातवाला ताब्यात देण्यात यावं, अशीही मागणी केली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, रोहितने लिहिलेली सुसाईड नोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, लोक प्रिती आणि तिच्या कुटुंबाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.