धक्कादायक ! जळगावात भरदिवसा तरुणाचा खून, सात जण गंभीर

#image_title

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात आज रविवारी सकाळी जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुकेश रमेश शिरसाठ (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात ६ ते ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात शनिवारी रात्री जुन्या वादातून मुकेश रमेश शिरसाठ आणि काही तरुणांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली होती. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केला.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

या हल्ल्यात निळकंठ सुखदेव शिरसाठ, कोमल निळकंठ शिरसाठ, ललिता निळकंठ शिरसाठ आणि सनी निळकंठ शिरसाठ हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, मुकेश रमेश शिरसाठ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेमुळे शिरसाठ कुटुंबावर शोककळा पसरली असून, वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे नातेवाईक आणि मित्र मोठ्या संख्येने जमा झाले होते.

घटनास्थळी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचले असून,   पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.