जळगाव : धरणगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी थरारक घटना घडली. विहीर फाट्याजवळ गोपाल मालचे (रा. धरणगाव) याचा सिनेस्टाईल पाठलाग करत, थेट डोक्यात गोळी झाडून निघृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात विशेष बाब म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वतः धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने खून केल्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जुन्या वादातून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, मात्र याबाबतचा सविस्तर तपास सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच, धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. प
या घटनेमुळे विहीर फाट्यासह संपूर्ण धरणगाव परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात चिंता व्यक्त केली असून, पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
घटनेचा थरार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोपाल मालचे हे आपल्या वाहनातून जात असताना, अज्ञात व्यक्तीने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर गाडीतून उतरवून डोक्यावर थेट गोळी झाडली. दोन ते तीन फायर झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.