---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : तापी नदीपात्रात डोहात एका अज्ञात युवतीचा खून करून तिचा मृतदेह सिमेंटच्या वजनदार खुणेला बांधून फेकला. ही धक्कादायक घटना रावेरच्या निंभोरासीम येथे समोर आली आहे. दरम्यान, हा तपास पोलिसांसमोर आव्हान आहे.
तब्बल तीन दिवसांनंतर डोहात फेकलेला मृतदेह पाण्यावर फुगून वर आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३० ते ३२ वर्षे वयोगटातील अनोळखी युवतीचा गळा ओढणीच्या साहाय्याने आवळून हत्या करण्यात आली होती. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पुलावरून खोल पाण्यात फेकण्यात आल्याचे सांगितले.
याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा तपास अधिक गुंतागुंतीचा ठरत आहे. तथापि, निंभोरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक पुरावे, दूरध्वनी स्थानिक जाळे आणि हरवल्याच्या नोंदींच्या आधारे तपास पुढे नेत आहेत.
या गंभीर प्रकरणाचा अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि फैजपूरचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हरिदास बोचरे पाटील व फौजदार दीपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक कार्यरत आहे. रावेर, मुक्ताईनगर, मलकापूर तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा, खरगोन जिल्ह्यांमध्ये तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात येत आहेत.