पाचोरा । देशात नवरात्रौत्सवाची धामधूम पाहायला मिळत असून, विविध ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळण्यासाठी तसेच त्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह आबालवृद्धही हिरिरीने सहभागी होत आहे. मात्र, पाचोरा शहरात गरबा खेळताना चक्कर येऊन २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दाडींया प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.
पाचोरा शहरातील कैलामाता देवी मंदीर परिसरातील गरबा महोत्सवात खेळत असताना लखन वाधवानी (२६,रा.सिंधी कॉलनी) हा तरुण अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. त्यास सहकाऱ्यांनी तातडीने विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेची वार्ता शहरात पसरली असता सर्वांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली स्व. लखन वाधवानी हा दांडीया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी दांडीया ‘किंग’चा माणकरी ठरत होता. त्याच्या परीवाराची अत्यंत नाजुक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता.
चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंप वर तो कामाला होता. शुक्रवारी सकाळी स्व.लखन वाधवाणी याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात दुपारी १२ वाजेपर्यंत सिंधी व्यापारी बांधवानी आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्याच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.