चहा पिण्यासाठी आला; अज्ञातांनी झाडल्या थेट पाच गोळ्या, भुसावळात घटनेनं खळबळ

#image_title

जळगाव : भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात आज, १० जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पूर्व वैमनस्यातून तहरीन नजीर शेख (३०) या तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

तहरीन शेख हा डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात चहा पिण्यासाठी आला होता. यावेळी तीन ते चार संशयितांनी गावठी पिस्टलातून तहरीनवर पाच गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर दुकानातील ग्राहकांनी पळ काढली तर संशयित आरोपी दुचाकीवरून पसार झाले. शरीराच्या विविध भागांवर गोळ्या लागल्याने तहरीनचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या चार संशयित आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

तपासादरम्यान, तहरीन शेख हा यापूर्वी आफात पटेल खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पूर्वीच्या वैमनस्यातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास अधिक गतीने सुरू केला आहे.

या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.