पंचप्रणाप्रती युवकांनी कटीबध्द व्हावे : राजेंद्र नन्नवरे

जळगाव  : देशाच्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या कालावधीत दिलेल्या पंचप्रणाप्रती युवकांनी कटीबध्द व्हावे व भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्यासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिरात केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय एकत्मता शिबीरात आज शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांशी राजेंद्र नन्नवरे यांनी संवाद साधला. यावेळी मंचावर पुणे येथील रा.से.यो. विभागीय संचालक अजय शिंदे, गुजराथ येथील मुकेश रोही व रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते.

नन्नवरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा कार्यकाळ सुरु झाला असून सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत असणार आहे. या काळात पंतप्रधानांनी दिलेल्या विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त्तता, भारतीय परंपरेचा गर्व, एकता व एकजूटता आणि नागरीक म्हणून कर्तव्याचे पालन हे पंचप्रण आहेत. या पंचप्रणांची यशस्वीरित्या अंमलबजावणी युवकांनी करुन देशाच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान द्यावे असे आवाहनही केले. यावेळी देशातील विविध ११ राज्यातील २१० विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक मोहित सरकार (नागपूर) याने तर आभार रा.से.यो. स्वयंसेवक प्रेरणा गोसालिया (पुणे) हिने मानले.

आज जागतिक एडस् दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झालेल्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी विद्यापीठात मानवी साखळी तयार केली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. तसेच या शिबिरार्थींनी प्लास्टीक मुक्त अभियान विद्यापीठ परिसरात राबवून स्वच्छता केली. सकाळी व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील यांच्या हस्ते रा.से.यो. ध्वजाचे आरोहण करण्यात आले.