साकळी बस स्टॅण्ड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे दीपक मराठे या युवकाचा अपघात झाला असून, रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. साकळी बस स्टॅण्ड ते गावापर्यंत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहनधारकांसाठी हा रस्ता डोकेदुखी व अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. गावातील महात्मा फुले चौकापर्यंत नवीन रस्त्याचे बांधकाम झाले आहे. त्या ठिकाणी नवीन रस्ता व जुना रस्ता यांच्यामध्ये जवळपास नऊ ते दहा इंच उंचीचे अंतर असल्याने पायी चालणारा असो किंवा वाहनधारक यांच्या लक्षात येत नाही.
दरम्यान, साकळी (ता. यावल) येथील शेतमजुरी करणारा युवक दीपक मराठे हा या रस्त्यावरून मोटारसायकल चालवत असताना जुन्या व नव्या रस्त्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणी त्याच्या वाहनाचा तोल गेल्याने त्याच्या मोटारसायकलीला गंभीर स्वरूपाचा अपघात झाला. त्यामुळे त्याला मार लागला असून अंगावर काही ठिकाणी दुखापत झालेली आहे. तसेच त्याच्या मोटारसायकलीचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. समोरच्या भागाची मोडतोड झालेली आहे. दीपक मराठे या अपघातातून थोडक्यात बचावलेला आहे, असे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अशाच प्रकारचे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात व वाहन चालक नागरिकांना दुखापत होत असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावरील मुख्य हायवेच्या पुलाच्या समोरील तीन रस्त्यांच्या मधोमधचा भाग हा अपूर्णच पडलेला आहे. या अपूर्ण ठिकाणी चोपड्याकडून येणारा तसेच यावलकडून येणारा तसेच गावातून जाणाऱ्या वाहनधारकांच्या या रस्त्याजवळचा खोलगट भाग लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणीही अपघात होत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून वापरणारे वाहनधारक प्रवासी जीव मुठीत घेऊन वापरत असतात. तरी या रस्त्याच्या अपूर्ण कामांकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष देऊन या रस्त्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधून करण्यात येत आहे.