नवी दिल्ली : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक युवराजसिंग आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून तो निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. बॉलीवूड अभिनेता सनी देओल सध्या गुरुदासपूरमधून भाजपचा खासदार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर युवराज राजकारणात प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं आहे. गडकरी यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) युवराज आणि त्यांची आई शबनम सिंग यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी निवडणुकीत युवराजला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि सनी देओलनंतर तो या मतदारसंघात भाजपचा चेहरा बनू शकतो. जर हे खरे असेल तर, युवराज राजकारणात प्रवेश करणाऱ्या गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांच्या यादीत सामील होईल.