---Advertisement---

Jalgaon News : लवकरच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक ; इच्छुक लागले तयारीला!

---Advertisement---

जळगाव : गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यातच जळगाव जिल्ह्यातील जि. प. आणि पं. स. निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यांत होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जिल्हाभर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेची शेवटची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर विविध कारणांमुळे या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. आता, जिल्हा परिषदांसाठीची प्रारूप गट-गण रचना १४ जुलै रोजीच जाहीर झाली आहे. यावर हरकती-सुनावणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर १८ ऑगस्टपर्यंत अंतिम गट-गण रचना प्रसिद्ध केली जाईल. यानंतर गट-गणनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित होईल आणि निवडणुकांचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. महानगरपालिका आणि नगरपालिकांची प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये जाहीर होणार असल्याने, त्यांच्या निवडणुका जि. प. आणि पं. स. निवडणुकांपेक्षा उशिराने होतील.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गण आहेत. सध्या जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांची ताकद जास्त असली तरी, या स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आणि गट-गणांचे राजकारण महत्त्वाचे ठरते. महायुतीमधील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक आहे. तर, दुसरीकडे तुलनेत कमी ताकद असलेली महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणूक लढवण्यावर भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे, यंदाच्या जि. प. आणि पं. स. निवडणुका चौरंगी होण्याची दाट शक्यता असून, यामुळे लढती अधिक अटीतटीच्या होणार आहेत.

२५ वर्षांपासूनचा भाजपचा अभेद्य गड

जिल्हा परिषदेवर गेल्या २५ वर्षापासून भाजपची निर्विवाद सत्ता आहे. हा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावेल. तर, महाविकास आघाडीसह महायुतीतील घटक पक्ष देखील भाजपची ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी कंबर कसताना दिसणार आहेत. बहुमतासाठी ३५ची ‘मॅजिक फिगर’ गाठण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर असेल.

इच्छुक लागले तयारीला!


जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधी होणार असल्याने, गेल्या तीन ते चार वर्षांपासून तयारी करत असलेल्या इच्छुकांनीही आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे. आपापल्या गट-गणात संपर्क वाढवला असून, तिकिटासाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---