यंदा संत तुकोबारायांची पालखी रथ ओढण्याचा मान ‘या’ बैलजोड्यांना मिळणार

by team

---Advertisement---

 

देहू : दरवर्षी आषाढी वारी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्याच बरोबर त्यांच्यासोबत संतांचे पालखी रथ देखील जात असतात.
बैलांच्या सहाय्याने या पालखी रथ ओढले जातात. त्यामुळे बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या बैलजोडीला पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळावा अशी आशा असते. अशातच यंदा जगद्‌गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला मिळाली आहे. तर चौघडा गाडी ओढण्याचा माण टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या जोडी मिळाला.

२६ पैकी ३ बैलजोड्यांची झाली निवड

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी ही निवड केली. माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे व भानुदास महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

नांदेड, लोहगाव, चिखली टाळगावच्या बैलजोड्यांना मिळाला मान

सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा व राजा आहे. त्याचप्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार-गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. तर पालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.

पालखी सोहळ्यासाठी तयारी जोरात सुरू

देहू संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी तयारी सुरू आहे. देहू नगरपरिषदेच्या वतीने विविध कामे सुरू आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नुकतीच देहू येथे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तयारी सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---