अंजाळे पुलावरील अपघातातील जखमी बालकांचा मृत्यू, पोलिसांच्या समजुतीनंतर मृतदेह घेतला ताब्यात

यावल :  अंजाळे जवळील मोर नदीच्या पुलावर गुरूवारी सांयकाळी एका कार चालकाने दारूच्या नशेत दोन दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत एका दुचाकीवर मागे बसलेला १४ वर्षीय बालक हा थेट पुलावरून नदीपात्रात कोसळला होता व गंभीर जखमी झाला होता. या बालकाचा शुक्रवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये अंजाळे येथील नागरीकांनी गर्दी केली व जो पर्यंत कार चालक व कारमध्ये दारू पित असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमीका घेतली आहे.

डिवायएसपी व पोलीस निरिक्षकांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह नातलगांना सोपवण्यात आला. अंजाळे ता. यावल येथील मोर नदी वरील पुलावर गुरूवारी सांयकाळी कार क्रमांक एम.एच. १९ बी.यु. ३०८५ वरील चालक श्रीराम सुरेश सोनवणे रा. यावल यांनी भुसावळकडून भरधाव वेगात येतांना दोन दुचाकींना धडक दिली होती. या अपघातात अरविंद प्रभाकर पाटील वय ४५ रा. बोरावल खुर्द, देवेंद्र रामभाऊ शेकोगार व त्यांचा मुलगा गुणवंत उर्फ ओम देवंद्र शेकोगार वय १४ दोघं रा. अंजाळे हे गंभीर जखमी झाले होते.

विशेष म्हणजे अपघात इतका भिषण होता की, १४ वर्षीय गुणवंत हा दुचाकीला धडक बसताच थेट पूलावरून नदीपात्रात कोसळत गंभीर जखमी झाला होता. भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी अंजाळे गावात येताच नागरिकांनी भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये गर्दी केली. जोपर्यंत दारूच्या नशेत असलेला कार चालक व त्याच्या सोबत असलेल्या इतर सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमीका मयताच्या कुटुंबीयांनी घेतली. येथे फैजपूर डीवायएसपी अन्नपुर्णा सिंग, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी जाऊन मयताच्या नातेवाईक व जमावाची समजूत काढली तब्बल तीन तासानंतर जमाव शांत झाला. मयत बालकांवर अंजाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.