छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागणारे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत नेहरूंचे वंशज ‘गांधी’ असल्याचे जाहीरपणे संबोधित करताना दिसत आहेत. मुळात अंश नसलेल्या बनावट वंशाच्या लोकांना नेहरूंचे वंशज ‘गांधी’ कसे? याचे पुरावे न मागता, उलटपक्षी त्यावर स्वतःहून शिक्कामोर्तब करताना दिसत आहेत. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही, झुकणार नाही, असा बाणा दाखविण्याचा देखावा करणा-या उद्धव ठाकरेंच्या शिपायाची दिल्लीश्वरांसमोरची ‘झुकवेगिरी या लोकांची खरी प्रवृत्ती, चेहरा जगासमोर येण्यासाठी पुरेशी आहे.
९ ऑगस्ट हा क्रांतिदिनाचा, ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या महात्मा गांधीकृत घोषणेचा दिवस. त्याच दिवशी नेहरू वंशातील एका ‘गांधी’ने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश भारतीय संसदेत दिला. सत्तालोलुपतेविरोधात एक ‘गांधी’ उभा राहिलेला देशाने पाहिल्याचे या राऊतांचे म्हणणे आहे. मुळात राहुल गांधींचा आणि महात्मा गांधींचा कुठलाही संबंध नाही. शिवाय गांधींच्या वैचारिक भूमिकेशी आणि राजकारणाशी राहुल गांधींचा काडीचाही संबंध नाही.
गांधींनी दिलेली घोषणा आणि त्या घोषणा दिनाचादेखील दुरान्वये संबंध नाही. केवळ आडनाव बदलून घेतलं म्हणून कोणी महात्मा गांधींचे वारस होऊ शकत नाही. महात्मा गांधींनी आपला राजकीय वारसा आपल्या मुला-मुलींनादेखील दिला नव्हता. मग हे कोण आम्ही गांधींचे वारस सांगणारे…? गांधींनी आपल्या मुला-मुलींना आमदार-खासदार, मंत्री, पंतप्रधान केलं नाही. वरळी मतदार संघाप्रमाणे सत्तालोलुपतेतून आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी, मंत्री करण्यासाठी कुण्या कार्यकर्त्यांचा हक्क मारला नाही. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेल सांगून स्वतः खुर्चीवर बसणे… याला खरी सत्तालोलुपता म्हणतात. गांधींनी ठरवलं असतं, तर आपला वारस त्यांनी सक्रिय राजकारणात आणून मोठा केला असता. कोणी विरोध केला असता? कोणाची हिंमत होती, त्यावेळी गांधींच्या मुला-मुलीला पद देऊ नका म्हणण्याची! पण गांधींनी आपल्या वारसांना आयतं काही दिलं नाही. उलट नेहरूंनी आपल्या मुलीला आयता वारसा देऊन मोठं केलं.
गांधींचे वारस असल्याची प्रचीती येऊन त्याला प्रमाणित करणा-या अफाट बुद्धी आणि ज्ञानाच्या धनींच्या स्मरणात आहे की नाही माहिती नाही; पण जे एक गांधी अलीकडे संसदेच्या सभागृहात मोदी-शाहांच्या विरोधात उभे दिसले ना राऊतांना… त्याच महात्मा गांधींचा अंश नसलेल्या बनावट वंशाचे आणखी एक गांधी म्हणजे यांचे पिताश्री स्व. राजीव गांधी हे महात्मा गांधींच्या ख-या वंशजाच्या म्हणजे गांधींचे खरे नातू राजमोहन गांधी यांच्या विरोधात १९८९ मध्ये अमेठी मतदार संघात लोकसभेला उभे होते.
आणि ज्या महात्मा गांधींचा वारसा सांगत आपली राजकीय पोळी आजवर शेकत आलेल्या या अंश नसलेल्या गांधींनी ख-या महात्मा गांधींच्या वंशजाला पराभूत केले. हा खरा इतिहास आहे. महात्मा गांधींविषयी एवढे प्रेम आहे. अर्थात दाखवता तर, त्यांचा नातू म्हणून ती जागा त्यांच्यासाठी का सोडली नाही? gandhi-thackeray-Modi महात्मा गांधींचा नातू आहे म्हणून, माघार घेऊन बिनविरोध निवडून का येऊ दिले नाही? एवढेच नाही तर जनता दलाने राजमोहन यांना राज्यसभेवर पाठवले तेव्हाही गांधींचे वंशज सांगणा-यांना लाज वाटली नाही.
हा खरा इतिहास आहे. स्वतःला महात्मा गांधींचे वंशज म्हणवून घेत असले, तरी मुळात गांधीजींचा अंशही नसलेल्या या डुप्लिकेट ‘गांधीं’ची चमचेगिरी करताना संजय राऊत यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवलेला दिसतो. राजकीय स्वार्थासाठी आमच्या महाराजांच्या परिवाराला पुरावे मागणा-या या राऊतांना लाज वाटली नव्हती आणि आता दिल्लीत मुजरेगिरी-हुजरेगिरी करतानादेखील लाज वाटत नसल्याचे दिसते. मुळात ‘निर्लज्जम् सदा सुखी’ म्हणतात ना तशातलाच हा भाग म्हणावा लागेल. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळविण्यासाठी, निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारमधील विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतो.
पंतप्रधानांची भेट घेत असतो. कारण, त्या मुख्यमंत्र्याला आपल्या राज्याचे आणि राज्यातील जनतेचे हित बघायचे असते. विनंत्या केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय घरी बसून केवळ फेसबुक लाईव्ह करून आणि रोज केंद्र सरकार, पंतप्रधानांना शिवीगाळ करून मदत मिळविता येत नसते. त्यातून राज्याचेच नुकसान होत असते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि स्वतःच्या अहंकारापोटी ‘दिल्लीसमोर झुकणार नाही, गुलामी करणार नाही’ म्हणत म्हणत तब्बल अडीच वर्षे राज्याच्या विकासाची पुरती वाट लावली.
दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी जाणा-या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीसमोर मुजरे करायला जातात, अशी टीका करणारे उद्धव ठाकरे आपल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे अन्य दिल्लीतील नेते यांना कित्येक वेळा भेटल्याचे (मुलासह मुजरे केल्याचे) बघायला मिळाले. आणि आता तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी चाटूगिरी करण्याच्या सर्व सीमा ओलांडल्याचे बघायला मिळत आहे.