जळगाव: भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाच्या निर्णयांविरोधात सतत भूमिका घेऊन असलेले खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर आपली गद्दारी चव्हाट्यावर आणत शिवसेना उबाठा गटाची पायरी चढली आहे. त्यांच्यासोबत सतत सत्तेच्या स्वप्नांच्या जगात वावरणारी काही मंडळीही समोर आली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उन्मेष पाटील यांना फारशी राजकीय पार्श्वभूमी नसताना धानसभेची उमेदवारी दिली. मात्र ते कधीही पक्षात फारसे रमले नाहीत. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांच्याविरोधात सतत वातावरण राहिलेले आहे. असे असताना पक्षाने त्यांना २०१५ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.चे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. मात्र मतदारसंघातील बेलगंगा साखर कारखान्यालाही ते न्याय देऊ शकले नाहीत, याबाबत परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सतत असंतोष त्यांच्या विरोधात राहिला.
अचानक लॉटरीचे फलित काय?
उन्मेष पाटील यांना २०१९ मध्ये भाजपने अचानक खासदारकीची संधी दिली. या काळात पक्षाच्या विद्यमान उपाध्यक्षा असलेल्या विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट कापून पक्षाने उन्मेष पाटील यांना संधी दिली. मतदारसंघात व्यक्तिगत तसेच मोठी नाराजी असताना उन्मेष पाटील हे केवळ पक्षाच्या लौकिकावर लोकसभेत पोहोचले. २०१९ ते २०२४ या कालावधीत उत्तम कामगिरी काय? असा प्रश्न केल्यास प्रत्येक क्षेत्रात नकारघंटाव ऐकायला या पाच वर्षात मिळाली. खासदारकीची अचानक लॉटरी लागली; पण त्याचे फलित काय असा प्रश्न अनेकांना पडत होता. त्याचे परिणामही दिसून आले.
उमेदवारी कापल्याने शिवसेना उबाठा गटाच्या संपर्कात
थयथयाट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची वारे वाहू लागले आणि उन्मेष पाटील पुन्हा जागे झाले. गावागावात फिरू लागले, पण ठिकठिकाणी जनतेच्या नाराजीलाच त्यांना सामोरे जावे लागत होते. स्थानिक मतदारसंघात त्यांना होत असलेला विरोध लक्षात घेऊन पक्षाने यावेळी त्यांना उमेदवारी नाकारली. याचा संताप त्यांच्याकडून व त्यांच्या मोजक्या समर्थकांकडून सुरू होता.पक्षाच्या विविध बैठकांना त्यांनी दांडी मारली व विविध कारणे सांगून उपस्थित रहाणे टाळले.गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील व त्यांचे काही समर्थक उबाठा गटाच्या संपर्कात होते. त्यांच्याबरोबर भाजपचे पारोळा पालिकेचे माजी नगराध्यक्ष करण पवार, जळगाव मनपातील माजी उपमहापौर सुनील महाजन, पारोळा पंचायत समिती माजी उपसभापती त्यानंतर जि.प. सदस्य असलेले ज्ञानेश्वर आमले हेदेखील उन्मेष पाटील यांच्याबरोबर आहेत