चाळीसगाव: राज्य शासनाच्या महसूल विभागाने महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्याचा गंभीर दुष्काळी तालुका म्हणून समावेश केल्याने शेतकरी बांधवांना व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार मंगेश चव्हाण यांचा राज्य शासनाकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश मिळाल्याने आगामी काळात सरकारच्या वतीने विविध सवलती, उपाययोजना राबविल्या जातील. जळगाव जिल्ह्यातील एकमेव दुष्काळी तालुका म्हणून चाळीसगावची निवड झाल्याने तालुक्यातील सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार मंगेशा चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, चाळीसगाव तालुक्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये 30 दिवसांच्या पावसाचा खंड पडल्याने पिकांची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे पीकविमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम नुकसानभरपाई मंजूर झाली असून दिवाळीपर्यंत ती मिळेल. सोबतच कमी पावसामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक असल्याने गंभीर अशी दुष्काळी परिस्थिती चाळीसगाव तालुक्यात निर्माण झाल्याची बाब मी वेळोवेळी प्रशासनाला व राज्य शासनाला कळवली होती. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाकडे चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा म्हणून शिफारस केली होती. अखेर आज शासन निर्णय घोषित झाल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ घोषित झाल्यामुळे शेतकरीच नव्हे तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांना विविध लाभ व सवलती मिळणार आहेत. केंद्र व राज्यातील महायुती सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेच. सोबत मीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या उपाययोजनांसोबतच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या चाळीसगाववासीयांना दुष्काळाची कमीत कमी झळ बसेल यासाठी एक परिवार म्हणून काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.