मुंबई ( दिपक वागळे ) : मागील काही दिवसांपासून दामोदर हॉल बचाव आंदोलनाला गती प्राप्त झाली आहे. दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ पुनर्बांधणीसाठी सुरू असणारे तोडकाम थांबवण्यात आले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने सहकारी मनोरंजन मंडळाने या पुनर्बांधणीसाठी केलेल्या आंदोलनाची बातमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नाट्यकलावंतांना दिलेला धीर यामुळे आता दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालय तिथेच उभे राहणार, याची आशा आता दामोदर बचाव आंदोलनातील नाट्यकर्मींना लागून राहिली आहे.
पुनर्बांधणीसाठी दामोदर हॉलवर हातोडा मारल्यानंतर त्याच जागेवर हॉल आणि मंडळाचे कार्यालय होणार नसल्याची खात्री पटल्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्त्वात आणि ‘पद्मश्री’नयना आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नाट्यनिर्माते, व्यवस्थापक परमानंद पेडणेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते हेमंत भालेकर, ज्येष्ठ शाहीर मधु खामकर, प्रायोगिक रंगमंच अध्यक्ष दिलीप दळवी, गणेश तळेकर आदी लोककलावंत, रंगकर्मींनी शांततापूर्ण निदर्शनाच्या माध्यमाने आंदोलनाची हाक दिली. सोशल सर्व्हिस लीगच्या पुनर्विकासासाठी असणार्या प्रकल्पात दामोदर हॉल तसेच सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालयाला देण्यात येणार्या जागेबाबत साशंकता व्यक्त करत पुनर्विकासात दामोदर हॉलच्या जागेवर ‘सीबीएसई’ शाळा प्रस्तावित असून कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही, असा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाने यावेळी केला.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लागलीच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लगेचच दुसर्या दिवशी आंदोलक नाट्यकर्मींची भेट घेत तेथील परिस्थिती जाणून घेतली आणि मदतीचे आश्वासनही दिले. त्यापद्धतीने सहकारी मनोरंजन मंडळातील सदस्य रवीराज नर, श्रीधर चौगुले आणि रुपेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांनाही दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या या कारवाईविषयक निवेदन दिले. त्यांनीही या दामोदर बचाव आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सदर ठिकाणचे तोडकाम थांबवून पर्यायी तिथेच हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ बांधून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. याचबरोबर नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही मंडळातील सदस्यांनी भेट घेऊन त्यांना दामोदर बचावसाठी निवेदन देण्यात आले. मंत्री मुनगंटीवार यांनीही सदस्यांना दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालयासाठी मदत करण्याचे आश्वसित केले.
कार्यालयात अजूनही विजेचा अभाव
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दामोदर हॉलच्या मागील बाजूस असणार्या सहकारी मनोरंजन मंडळाच्या याच कार्यालयात सदस्यांबरोबर चर्चा केली होती. दरम्यान, कार्यालयातील वीज व पाण्याचा पुरवठा सुरू करून देण्याबाबत तेथील कंत्राटदाराने असहमता दर्शवली आहे. सोशल सर्व्हिस लीग यांना वीज आणि पाण्याबद्दल विचारा, असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. सोशल सर्व्हिस लीग याबाबत टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे वीज व पाण्याचा प्रश्न खोळंबला आहे. त्याचप्रमाणे सहकारी मनोरंजन मंडळाचे कामकाजही खोळंबले असून राज्य नाट्य स्पर्धेच्या तालमीसाठी त्यामुळे कलाकारांना जागा उपलब्ध होण्यास समस्या निर्माण होत आहेत.
दुर्घटनेची दाट शक्यता
सदर जागेचे तोडकाम मागील चार दिवसांपासून थांबविण्यात आले असून आहे त्याच परिस्थितीत हे तोडकाम थांबवले आहे. तोडकामासाठी ज्या मेकअपरुममध्ये गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते, तेही त्याच पद्धतीने तसेच पडून आहेत. त्याच्यात वरती सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय असून त्यात दुर्मीळ गोष्टींचे जतन केले आहे. तोडकाम करत असणार्या कंत्राटदाराने याबात कोणतीही काळजी घेतली नाही. सर्व वस्तूंचा पसारा ‘जैसे थे’ असाच ठेवत तेथील कामगार सध्या दुसर्या ठिकाणी कामाला जात आहेत. यामुळे तोडकाम थांबवले असले तरीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सहकारी मनोरंजन’च्या नाट्यसंगीताचे अमेरिकेत जतन
सहकारी मनोरंजन मंडळाने १९६३ रोजी तयार केलेल्या ‘भाव-बंधन’ या संगीत नाटकातील मास्तर अनंत दामलेंनी गायलेले नाट्यगीत आजही अमेरिकेतील येथे जतन करण्यात आले आहे. अनंत दामलेंनी गायलेल्या या संगीत नाट्यगीताला मधुकर बर्वे यांनी गिटारच्या माध्यमातून संगीत दिले आहे, तर राम गणेश गडकरी यांनी या संगीत नाटकाचे लिखाण केले आहे.