अखेर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारांची भूमिका स्पष्ट

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अखेर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका करण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवारांनी या आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

शरद पवार म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. या बैठकीत त्यांना योग्य वाटेल त्या राजकीय लोकांना निमंत्रित करावं. विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही या बैठकीला हजर राहू आणि आमची सहकार्याची भूमिका राहील, असं मी त्यांना सुचवलेलं आहे. या बैठकीत महत्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना बोलवावं. याशिवाय मनोज जरांगे आणि छगन भूजबळ यांनाही निमंत्रण करावं. या संयुक्त बैठकीत चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आज ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने दिला आहे. यामध्ये काही अडथळा आल्यास केंद्र सरकारने याबाबत भूमिका मांडावी. यापूर्वी तामिळनाडूमध्ये ७३ टक्क्याच्या आसपास आरक्षण दिलं होतं. तो निर्णय कोर्टात टिकला होता. पण त्यानंतर जे निर्णय कोर्टात गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नसून ५० टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये असेच आहेत. याचा अर्थ हे धोरण बदललं पाहिजे. हे धोरण बदलण्याचा आणि ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारने यात पुढाकार घेण्याची तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहिल. सरकारच्या बाजूने आम्ही समन्वयाची भूमिका घ्यायला तयार आहोत,” असेही ते म्हणाले.