Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेत्यांनंतर आता खुद्द मराठा आंदोलनकर्ते आरोप करत आहे. आधी बारासकर महाराज आणि आता संगीत वानखेडे, मनोज जरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात असून त्यांनीच सगळा आंदोलनाचा खर्च केला आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनी केला आहे
संगीता पाटील म्हणाल्या की, “मी कायम मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या सोबत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सातत्याने त्यांची बाजू मांडत आले आहे. पण खरंतर सुरुवातीपासूनच जरांगेंचं चुकत आलंय. त्यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये दंगल घडवली की, घडली याचा सरकारने शोध घ्यावा. मनोज जरांगे हे कोण आहेत हे आधी कुणालाही माहिती नव्हतं. ज्यावेळी त्यांना सर्व राजकीय पक्ष भेटायला गेले तेव्हापासून त्यांना सगळे ओळखायला लागले.”
“मनोज जरांगे अगदी भोळा भाबडा, साधा, सरळ माणूस आहे असं समजून महाराष्ट्राने आणि मीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मी एक महिन्यापुर्वीपर्यंत त्यांच्या सोबत होते. पण हळूहळू काही गोष्टी समोर आल्यानंतर मी त्यांना विरोध करायला सुरुवात केली,” असे त्यांनी सांगितले.
“ज्यावेळी जरांगेंची बाजू घेतल्याने मला ट्रोल करण्यात येत होतं तेव्हा मनोज जरांगे माझ्यासाठी एक शब्दही बोलले नाहीत. त्यावेळी मी त्या बाईला माझी बाजू घ्या असं सांगितलं नाही आणि मला कोणालाही मोठं करायचं नाही, असे जरांगे म्हणाले होते. मला ओबीसींचे कार्यकर्ते फोन करुन गलिच्छ भाषेत बोलत होते. मी त्यावेळी जरांगेंना यावर बोलायला सांगितलं. पण ते काहीही बोलले नाहीत. सोशल मीडिया २४ तास त्यांच्यासोबत होती. पण महिलांना बोलू नका, असं एका शब्दानेही ते माध्यमांशी बोलले नाहीत.”
त्या पुढे म्हणाल्या की, “मी गेल्या एक ते दीड महिन्यापासून त्यांचा विरोध करत आहे. मनोज जरांगे कुणालाही विश्वासात घ्यायचे नाही. त्यांना फक्त शरद पवारांचाच फोन यायचा आणि ते त्यांना विश्वासात घ्यायचे. सगळ्या आंदोलनाचा खर्च शरद पवारांनीच केला आहे. कालांतराने हे सगळं पुढे येणार आहे. सर्व पक्षांचे नेते त्यांना भेटायला गेले. पण त्यांनी कुणालाच मनापासून प्रतिक्रिया दिली नाही. ज्यावेळी शरद पवार गेले तेव्हा मात्र त्यांचं प्रेम उफाळून आलं. परंतू, आम्हाला आरक्षण मिळणार असल्याने याकडे आम्ही दुर्लक्ष केलं,” असे त्या म्हणाल्या.
“हा लढा आरक्षणासाठी उभारला. आता आपल्याला कायद्यात टिकून राहणारं स्वतंत्र आरक्षण मिळत आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षणही मिळतच आहे. मग हा अट्टाहास कशासाठी? समाज वेडा नाहीये. या सर्व गोष्टी समाजाच्या लक्षात आल्या आहेत,” असेही त्या म्हणाल्या आहेत.