जळगाव : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शहराच्या हद्दीत प्रचंड काळोख असतो. उद्योजकांसह कामगार व नागरीकांच्या जीवीताला धोका लक्षात घेता पथदिव्यांसाठी मनपाकडून अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. पुढच्या आठवड्यात डीपीसीतून निधी मिळावा, यासाठी मनपा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देणार आहे. परंतु तो निधी मिळवून देण्यासाठी खासदारांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती आयुक्त डॉॅ. विद्या गायकवाड यांनी दिली.
अंजिठा लेणीमुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या महामार्गाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शहरातील अजिंठा चौकापासून ते विमानतळापर्यंत जळगावकरांना प्रवासाच्या दृष्टीने अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. या मार्गावर एमआयडीसीमुळे दिवसरात्र उद्योजक, कामगार व नागरीकांचा वापर सुरू असतो. रात्री महामार्गावर कमालीचा अंधार असल्याने अपघाताची भिती असते. याशिवाय विमानतळ सुरू होणार असल्याने मोठ्या शहरांमधून येणाऱ्या नागरीकांना जळगावात येताना चांगला अनुभव यावा यासाठी सुशोभिकरणाची गरज आहे. त्यामुळे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या पत्रानंतर आयुक्तांनी विद्युत विभाग व शहर अभियंता यांना अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर केला जाईल.