राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार आहे. निवडणुकीतही महायुती एकत्रित लढणार असल्याचे दावे केले जात आहे. या महायुतीत अजितदादा पवारांचा गट आहे. या गटामुळेच लोकसभेत भाजपचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही राष्ट्रवादीविरोधात वक्तव्ये दिली जात आहेत. त्यांच्या वक्तव्यावर खुद्द अजितदादा पवारांनीच नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. या घडामोडी राज्यात घडत असताना दिल्लीतून मात्र राष्ट्रवादीसाठी गुडन्यूज आली आहे. अजितदादा यांचे विश्वासू सहकारी खासदार सुनील तटकरे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी तटकरे यांची वर्णी लागली आहे. केंद्राच्या या समितीत एकूण ३१ सदस्य आहेत. यामध्ये लोकसभेचे २१ तर राज्यसभेचे १० सदस्य असतात.
पेट्रोल किंवा नॅचरल गॅसशी संबंधित एखादा विषय सभागृहात चर्चेला येणार असेल तर संबंधित समिती या विषयाची तपासणी करते. यानंतर सभागृहाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी या समितीची असते. या समितीत तटकरे यांची वर्णी लागली आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही घटना महत्वाची आहे. शिवाय तटकरे यांचे राजकीय वजनही वाढणार आहे.