सोलापूर: आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे.परंतु सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वाद रंगला आहे. या वादामुळे जिल्ह्यातील मोहोळ येथे अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली. तसेच अजित पवार यांचा दौरा रद्द केल्याचे वक्तव्य केले होते.
‘दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही’, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक झाले. पक्षातील माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजित पवार यांनी मोहोळ येथे उमेश पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले अजित पवार?
आज मोहोळ येथील जनसंवाद यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता उमेश पाटील यांचं नाव न घेता चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणाले, कुत्रं गाडी खाली जाते, तसं त्याला वाटते तोच गाडी चालतो. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. परंतु अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौरा आला म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला होता, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.