अजित पवारांची बारामती विधानसभेतून माघार, या नेत्याच्या उमेदवारीचे संकेत

आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल.

बारामती लोकसभा निवडणूक २०२४ कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कारण पवार कुटुंबियामधील ही लढत होती. नणंद-भाऊजाई अशी ही लढत झाली. या लढतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. त्यानंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीत लढत कशी रंगणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. आपणास आता निवडणूक लढवण्यात रस राहिला नाही. जय पवार याच्या उमेदवारीबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

काय म्हणाले अजित पवार
जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. अजित पवार यांच्या या निर्णयावर पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. तसेच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत मी आता अजित पवार यांना भेटणार आहे. त्यावेळी चर्चा करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत दादावर कुठलाही दबाव नव्हता, पार्लमेन्ट्री बोर्डाने तसा निर्णय घेतला होता, असे तटकरे यांनी म्हटले.

मतभेद नाही, आम्ही एकत्रच
मुख्यमंत्रीबाबत महायुतीत कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने महायुती सरकार चालवत आहोत. आम्ही सगळे एकत्रित काम करत आहोत. विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिला नाही. त्यामुळे ते असे उद्योग करत आहेत. आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सबळ होणार आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. इतरांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल.

विकास मुद्दा घेऊन, सरकारच्या योजना काय आहे? त्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा सुरु केली. केंद्र सरकार आपल्या योजना लोकांपर्यंत घेऊन जात आहे. आम्ही कामाची माणसे आहोत, दुसऱ्या कशात आम्हाला रस नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.